
Mr. Michael Mathew Colaco(1908-2000)
-recipient of the Papal award, "Pro Ecclesia Et Pontifice" 1967 (Vasai, India)
माणिकपूर,
बुधवार- ११-२-१९८७
मी तुमचा बाप , ह्या नात्याने हे सर्व लिहितो आहे. ह्याचा तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक विचार करून , मनन करावे . आपणावर आलेल्या प्रसंगातून योग्य मार्ग काढून सर्व प्रश्न प्रीतीने , शांततेने , व समजुतीने सोडवून आपणा सर्वांमध्ये आनंद आणावा , त्यातच तुम्हा सर्वांचे हित आहे. मला मान देऊन , कुणीही अडथळा न आणता आपले सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मदत करावी, अशी माझी तुम्हा सर्व मुलांजवळ व मुलींजवळ कळकळीची व आग्रहाची विनंती आहे .
माझी आई मरण पावली त्यावेळी मी १० वर्षाचा होतो . माझा बाप मरण पावला तेव्हा मी पंधरा वर्षाचा होतो. मी किती बिकट परिस्थितीत वाढलो , शिक्षण केले व नोकरी केली त्याबद्धलचा इतिहास लिहिलेला आहे व तुम्हापर्यंत पोहोचवला आहे . तुम्हाला वाढविण्यासाठी आईने व मी किती त्रास घेतला व तुम्हाला मदत केली , हे नव्याने सांगण्याची जरूरी नाही .
आमच्या वडिलांनी व पूर्वजांनी घराची अब्रू सांभाळण्यासाठी व राखण्यासाठी किती त्रास घेतला हे मला ठाऊक आहे. मी उपकारबुद्धीने ती सर्व माहिती लिहून ठेवलेली आहे. तुम्ही ती वाचली म्हणजे तुम्हाला प्रकाश दिसेल व ईश्वराच्या कृपेने प्रीतीने वागण्याची बुद्धी होईल .
आपला धर्मग्रंथ बायबलमध्ये प्रीतीविषयी खालीलप्रमाणे माहिती आहे :-
प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे . प्रीती हेवा करीत नाही , प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही. ती गैरशिस्त वागत नाही. स्वार्थ पाहत नाही. चिडत नाही , उपकार स्मरत नाही. ती अनीतीत आनंद मानीत नाही. तर सत्यासंबंधी आनंद मानीते . ती सर्व काही सहन करिते . सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते. सर्वांची आशा धरीते, सर्वांसंबंधाणे धीर धरीते.
प्रीतीबद्धल दिलेले वरील ज्ञान वाचून प्रत्येकाने त्यावर मनन करावे. त्याचबरोबर थोड्याच दिवसात आपण सर्वांनी एकत्र जमून खालील प्रश्न सोडविण्यासाठी मला मदत करावी , अशी माझी इच्छा आहे. मी वृद्ध झालो आहे, मला विरोध सहन होत नाही. आईच्या वर्षाच्या मिसाची तारीख मी २८-३-८७ रोजी ७:४५ वाजता निश्चित केलेली आहे.
कोणीही कोर्टाची भाषा न करता समजुतीने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अब्रू सांभाळण्यासाठी व टिकविण्यासाठी प्रीती मदत करील, असा माझा ढृढ विश्वास आहे.
तुमचा प्रिय बाप,



माणिकपूर ,
शुक्रवार ता . ४-७-८६
थोडक्यात माझ्या आयुष्याचा इतिहास :
खाली नमूद केलेली माझी परिस्थिति, संकटे, ढुःखाचे प्रसंग, ता. २९-११-८४ रोजी आईच्या माहितीसाठी लिहिलेली होती.
प्रत्येक मुलाने ही माहिती, माझा इतिहास मनपूर्वक रीतीने वाचावी व त्यावर मनन करावे. मी प्रत्येकाकडे त्यासाठीच एक प्रत राखून ठेवण्यासाठी देत आहे. ही सर्व मिळकत मिळविण्यासाठी व वाचवून ठेवण्यासाठी आम्ही किती दुःख, संकटे सोसली व काहीही करून ती जडजोकमात घातली नाही. नाहीतर आज परिस्थिति कितीतरी बिकट झाली असती. म्हणूनच प्रत्येकाने ईश्वराचे व माऊलीचे आभार मानून शांतपणे, समजुतीने , थोर अंतःकरणाने वागून आपल्या आई-वडिलांनी जशी त्यांच्या आई-वडिलांची अब्रू त्याग करून वाढविली, ती कमी न करता जास्तं प्रेमाने वागून ती वाढवावी. हयातच त्यांचा खरा मोठेपणा आहे.
१९२६ साली माझे लग्न होणार होते. परंतु माझी बहीण जानु साठी ते पुढच्या वर्षापर्यंत थांबवण्यात आले. १९२६ साली मी सेंट झेवीयर्स कॉलेज , मुंबई येथे आर्ट्सच्या पहिल्या वर्गात प्रवेश केला. माझी परिस्थिति अत्यंत बिकट होती. कॉलेजचा अभ्यास रोज दोन किंवा तीन तासाचा असे. माझा भाऊ फिलीप हा मला रोज दोन आणे देत असे. मी भात जेवण्यास घरी येत असे. कधी २ll वाजता तर कधी ३ll वाजता येऊन थंड झालेले जेवण घेतल्यामुळे मला त्रास व्हायचा . या कारणामुळे कंटाळून कॉलेज सोडून दिले व डावर्स कॉलेज मध्ये C .A. I .B च्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. नोकरी करून शिक्षण घ्यावे , हा हेतु ह्यात होता. परंतु माझा भाऊ फिलीप ह्याने मला सांगितले की, पहिल्यांदा कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून डिग्री मिळव, कारण डिग्रीला महत्व आहे. त्यानंतर डिप्लोमा कर. त्याप्रमाणे मग मी डावर्स कॉलेज सोडून इंटर–आर्ट्स साठी सेंट झेवीयर्सला नाव घातले.
पहिल्या वर्षाप्रमाणेच माझी परिस्थिति स .न .१९२८ मध्ये होती. परंतु लग्न झाल्यानंतर माझी बायको , तुमची आई ज्यावेळी माहेरी जायची , त्यावेळी तिला पदर बांधण्यास चार आणे मिळत असत. ती ते चार आणे मला देई. त्यामुळे परिस्थिति थोडीशी बरी होती. तिचे वडील दर शनिवारी तिला मिठाई देत असत. परंतु ती मिठाई ती स्वतः न खाता मला देत असे. त्यावेळी, निदान अर्धी मिठाई तरी तू घे , असा आग्रह मी तिला करीत असे. पण ती म्हणायची “मला गोड मिठाईची आवड नाही.”
मी १२ll पर्यंत कॉलेज असले तर २ll नाहीतर ३ll वाजता जेवण्यास घरी येत असे. ३ll वाजता येणार असलो तर ससानिया मध्ये १ कप चहा , १ समुशी खात असे.
इंटर आर्ट्सचा (२र्या वर्षाचा अभ्यासक्रम) अभ्यास जड होता. अवेळी थंड भात व मांदेली-बोंबील कडी , तसेच शेवलाची कडी खाऊन माझ्या पोटात दुखायचे. तेव्हा पोटाला खानकीचा पट्टा गोल बांधून मी अभ्यास करायचो. तेव्हा माझा भाऊ फिलीपने मला “क्यास्ट्लीन ब्रँडी “ ची बाटली आणली. जास्त दुखू लागल्यावर मी त्यातील थोडी घेत असे. पोटाच्या दुखण्यावर दूसरा इलाज म्हणजे पोटावर पैसा ठेवून , त्यावर कापूर जाळून ग्लास झुंबवीत. त्याने दुखणे थोडे कमी झाल्यासारखे वाटे.
इंटर-आर्ट्सची परीक्षा पास झाल्यानंतर माझ्या काकाने मला माझ्या जेवणाच्या व्यवस्थेबद्धल विचारले. तेव्हा मी काकाला माझी खरी परिस्थिति सांगितली. काका ऑनररी बेंच मॅजीसस्ट्रेट, अंधेरी कोर्टात काम करीत. कोर्ट ११-१२ वाजेपर्यंत चालून नंतर बंद होत असे. अंधेरी स्टेशनजवळ कोर्टाने पहिला संपूर्ण मजला भाड्याने घेतला होता. काम १२ वाजता संपल्यानंतर माझा काका एकटाच त्याठिकाणी काम करीत असे. काकाने मला सर्व स्थिति दाखवून संगितले की, जेवणासाठी तू घरी जाऊ नको, माझ्याकडे ये. संध्याकाळ पर्यंत अभ्यास करून मग घरी जा. त्याप्रमाणे मी दोन वर्ष त्यांच्याकडे जात होतो. मी येईपर्यंत तो थांबत असे. त्यानंतर दोन “ताट” मागवीत असे. नंतर ४-४ ll वाजता एक नवटाक बदामी हलवा व एक कप चहा मला देत असे.
माझी आर्थीक परिस्थिति खराब असल्यामुळे आमचे लॉंजीकचे प्राध्यापक फादर सोला ह्यांनी विनंती करून अर्धा फी माफ केली. मी त्यांच्या म्हणजे “लॉजीक” ह्या विषयात कॉलेजात दूसरा नंबर काढल्यामुळे त्यांना आनंद झाला. त्यांनी मला विचारले की, तू कोणती पुस्तके व एक्झरसाइजची पुस्तके वाचत होता ? मी त्यांना संगितले , “ मी फक्त तुमचे (म्हणजे फादर सोलाचे) पुस्तक वाचीत होतो व तुम्ही क्लासमध्ये दिलेल्या एक्झरसाइज वाचीत होतो”. तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटले. ते मला म्हणाले- “तुझी बुद्धी छान आहे. परंतु मी त्यांना संगितले की, माझी परिस्थिति बिकट आहे व त्यामुळे कॉलेज सोडण्याची ईच्छा आहे. परंतु त्यांनी मला संगितले की, “तू कॉलेज सोडू नकोस. मी प्रिन्सिपल फादर धूर ह्यांस सांगून तुला माफक फी मध्ये कॉलेजात ठेवण्याची व्यवस्था करीन”. त्याप्रमाणे त्यांनी मला अत्यंत कमी फी मध्ये कॉलेज करण्याची , शिक्षणाची संधी दिली. तरी देखील माझी आर्थीक बाजू इतकी कमकुवत होती की तेवढी फी देखील मी भरू शकलो नाही. पुष्कळ वेळा माझे नाव नोटिस बोर्डावर लावण्यात आले. माझे नाव कॉलेजमधून कमी करण्यात येईल, असेही मला सांगण्यात आले. परंतु त्यांनी तसे काही केले नाही, म्हणून मी कॉलेज शिक्षणाची शेवटची दोन वर्ष पूर्ण करू शकलो.
१९३१ साली मी बी. ए. झालो. १८ डिसेंबर १९३१ रोजी मला नोकरी मिळाली. त्यानंतर मी लाॅ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. जानेवरी १९३२ पासून सकाळ ते संध्याकाळ नोकरी , संध्याकाळी लाॅ कॉलेज व नंतर रात्री घरी, हा माझा कार्यक्रम झाला. अशाप्रकारे १९३२ ते १९३३ पर्यंत मी लाॅ च्या दोन्ही वर्षाच्या परीक्षा पूर्ण केल्या.
१९३१ ऑक्टोबर मध्ये मॅथ्यूचा जन्म झाला. १९३३ मध्ये जोसेफचा जन्म झाला. इन्कमटॅक्स- डिपार्टमेंटमध्ये कारकून म्हणून नोकरीला असताना माझा पगार फक्त ६० रुपये होता. नंतर ९० रुपये झाला. त्यानंतर १२० रुपये. १९४६ मध्ये ऑफीसर झाल्यानंतर २५० रुपये पगार झाला. १९४९ मध्ये घराचे नवीन रचनेचे काम मी हाती घेतले. त्याचे कर्ज फिटण्याच्या अगोदरच मला १९५४ मध्ये ऑफिसरवरून इंस्पेक्टर पर्यंत खाली आणण्यात आले. ४५० रुपये पगारावरुन माझा पगार २५० रुपये झाला. अशा सर्व स्थितिमध्ये आपला उदरनिर्वाह चालवीला. आईने देखील इकडून- तिकडून पैसे मागून संसार पुढे नेला. जास्त जरूरी असल्यास मी रे. फा. स्टॅनीलॉज फर्नांडीस कडून व इतरांकडून पैसे मागत असे. एका बाजूने त्या पैशाची फेड करणे , दुसर्या बाजूने संसाराला मदत करणे मला डोईजड झाले. पण मी जेमतेम यातून मार्ग काढीत होतो, म्हणून आईचा मज बद्द्ल गैरसमज झाला.
अशा सर्व कठीण प्रसंगातून सुद्धा मी बाग लावण्याचे काम चालू ठेवले. त्याचे फळ म्हणून आज राजावली येथे सुशोभीत बाग दिसत आहे. याच अवधित मी बेडे बांधण्याचे काम देखील चालू ठेवले व छप्पर पर्यंत काम पूर्ण केले. त्या श्र्माचे बक्षीस म्हणून तिथे कारखाना सुरू होऊन , लायनसच्या पुढाकारामुळे १००० रुपये भाडे दर महिन्यास मिळते.
माझ्या व्यक्तीगत व कौटुंबिक जबाबदारीच्या जीवनात मी पुष्कळ दुःखे , संकटे सोसली. वादळवार्याचे तडाखे सोशीत असताना उन्म्ळुन पडण्याची पाळी माझ्यावर आली. परंतु मी धीर धरला. ताठ उभा राहून खंभीरपणे सर्व तडाखे परतवून लावले. जीवनातील काटेरी वाट तुडवत आज आपण सुखाच्या हिरवळीवर पोहोचलो आहोत.
या घरात सामंजस्याचे वातावरण निर्माण व्हावे , शांतता निर्माण व्हावी , तुम्हा सर्वांचे कल्याण व्हावे , म्हणून मी रोज परमेश्वराकडे प्रार्थना करतो. सत्याचा विजय होऊन असत्य बाहेर फेखले जाईल , याबद्दल मला खात्री आहे.
आईने व मी कठीण परिस्थिति पार करून आजची परिस्थिति निर्माण केली. हे जाणून तुम्ही खालील सर्व प्रश्न , समजुतीने शांत मनाने , मी जीवंत आहे तोपर्यंत सोडविण्यास मदत करावी अशी माझी तिव्र इच्छा आहे.
तुमचा प्रिय बाप,
मायकल मॅथ्यू कोलासो (७-७-१९८६)
My Mother is Queen, of Heaven and Earth,
There is therefore no cause to fear,
Come my Children, come to me,
Ask whatever that you will.
Mother's heart though tender one,
Doesn't depend upon your will.
That what is good, the mother gives.
That which is bad, is denied.
Trials remember come from God.
Happy is he, who bears them all.
Resurrection after the fall,
is the kingdom of God.
God loveth one and all,
All and one, His will be done.
( This Poetry is dedicated to my beloved wife Mrs. Santan Colaco )

